एम.जे.न्यूज सातारा,(प्रतिनिधी) वसंत सिरसाट
नांदेड : दि.12, शेताकडे गेलेला युवक गावाकडे येण्यासाठी रस्ता ओलांडत असतांना भरधाव वेगातील वाहनाने धडक दिल्याने या अपघातात एक 18 वर्षीय युवक जागीच ठार झाल्याची घटना नांदेड- हैदराबाद या राज्य महामार्गावर दि.12 एप्रिल 2025 रोज शनिवारी सकाळी 7:00 वाजताच्या दरम्यान घडली आहे. या प्रकरणी उस्माननगर पोलीस ठाण्यात अज्ञात वाहन चालका विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
लोहा तालुक्यातील मारतळा येथील युवक प्रथमेश शिवाजी इर्लेवाड (वय 18 वर्ष) हा आपल्या शेताकडून गावाकडे येत असतांना वै. मामासाहेब महाराज यांच्या समाधी मंदिरा जवळील रस्ता ओलांडत होता. त्याच वेळी भरधाव वेगातील अज्ञात वाहनाने युवक प्रथमेश इर्लेवाड यास जोराची धडक दिली. यात तो जागीच ठार झाला. या घटनेची माहिती उस्माननगर पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी इन्क्वेस्ट पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी नांदेड येथील शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला. तर फरार झालेल्या अज्ञात वाहनाचा शोध पोलीस घेत आहेत.
मयत प्रथमेश इर्लेवाड यांचे पश्चात- आई, वडील, तीन बहिणी असा परिवार असून त्याचे वडील शिवाजी इर्लेवाड हे राज्य परिवहन महामंडळाच्या बिलोली आगारात चालक आहेत. प्रथमेश हा आपल्या आई वडीलास एकुलता एक मुलगा होता. आपल्या एकुलत्या एका मुलाचा मृत्यू झाल्याने इर्लेवाड परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.