युती आघाडी मधे अजून ही गुंता भाजपचा निर्धार ठाम सत्ता कोणाच्या दारी???? युती आघाडी मधे अजून ही गुंता भाजपचा निर्धार ठाम सत्ता कोणाच्या दारी????


MJ.NEWS.SATARA
युती आघाडी मधे अजून ही गुंता
भाजपचा निर्धार ठाम
सत्ता कोणाच्या दारी????



युती आघाडी मधे अजून ही गुंता
भाजपचा निर्धार ठाम
सत्ता कोणाच्या दारी????

(हेमंत पाटील कराड)
कराड.दि.१०.कराड शहराची नगरपालिकेची निवडणूक जशी जवळ येतेय, तसा राजकीय पट अधिकच रंगतदार होत चालला आहे. २ डिसेंबरला मतदान निश्चित झाल्यानंतर पक्षांच्या हालचालींना वेग आला आहे. मात्र अजूनही 'कोण कोणासोबत?' या प्रश्नाचे उत्तर धूसरच दिसतेय.
एकीकडे भाजपचे आमदार डॉ. अतुल भोसले यांनी पालिकेवर कमळ फुलवण्यासाठी मोठी तयारी सुरू केली आहे, महायुती झाली किंवा नाही झाली तरीही 'भाजपचा नगराध्यक्ष' यावर ठाम भूमिका घेत त्यासाठी कोणतीही तडजोड न करण्याची तयारी त्यांनी ठेवली आहे. शिंदे सेनेने मात्र थेट नगराध्यक्षपदाचा उमेदवार जाहीर करत आघाडी घेतली आहे तर राष्ट्रवादी अजित पवार गट अद्याप मौन धारण करून आहे. दुसरीकडे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेल्या अनुक्रमे काँग्रेस आणि शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या महाविकास आघाडीतील मतभेद अद्याप मिटलेले दिसत नाहीत. काँग्रेस आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाची बैठक झाल्याचं दिसतंय; पण राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) अद्याप सावध भूमिकेत दिसत आहे. त्यामुळे आघाडीचं समीकरण अजूनही ‘वेट अँड वॉच’च्या स्थितीत आहे.
तिरंगी लढतीची चिन्हं...
कराडमधील लढत केवळ मतांची नाही, तर राजकीय प्रतिष्ठेची बनली आहे. महायुतीतील भाजप–शिंदेसेना अंतर्गत ताण कमी होण्याचं नाव घेत नाही, आणि महाविकास आघाडीही अजून निर्णायक तोडग्यापर्यंत पोहोचलेली नाही. या स्थितीत जर भाजपने एकला चलो रे ची भूमिका घेतली. आणि शिंदेसेना व अजित पवार गट एकत्र आले, तर या दोघांच्या विरोधात काँग्रेस–उद्धवसेना–शरद पवार गट एकाच छत्राखाली उभे राहू शकतात. अशा स्थितीत कराडकरांना फिरंगी लढतीचा थरारक सामना पहायला मिळू शकतो.
पण या तिरंगी स्पर्धेत मतांचं विभाजनच निकालाचं पारडं हलवू शकतं, आणि म्हणूनच स्थानिक पातळीवर सध्या एकच चर्चा आहे की —
'विरोधकांनी मोट बांधली तर कराडवर पुन्हा कमळ फुलेल का?' या प्रश्नाचं उत्तरही येत्या काही दिवसांत मिळेल. पण सध्या प्रत्येक गट चाचपणी करण्यात व्यस्त दिसत आहे.

जुन्या गोटांचे वारे आणि नवे संधिसंघर्ष...
कराड तालुक्यात पूर्वी कोणतेही निवडणूक असली तरी दिवंगत पी. डी. पाटील साहेब आणि दिवंगत विलासकाका पाटील या दोन सत्ता केंद्रांमध्ये अलिखित समझोता होता. कोणी कोणाच्या संस्थांत किंवा कोणाच्या सत्ता केंद्रात हस्तक्षेप करत नसे. एकमेकांना डिवचण्याचा कोणताही प्रकार थेट पाहायला मिळत नसे. त्यामुळे तालुक्याचं राजकारण या दोन सत्ता केंद्राभोवती फिरत राहायचं. मात्र अलीकडच्या काळात या राजकीय समीकरणाचा पट पूर्णपणे बदलला. बाळासाहेब पाटील व डॉ . अतुल भोसले यांनी जिल्हा बँक आणि बाजार समित्यांत एकत्र येत नव्या समीकरणांचा प्रयोग केला. त्याचा फार थोडा फायदा बाळासाहेब पाटील यांना तर सर्वाधिक फायदा डॉ. अतुल भोसले यांना झाला. विधानसभा निवडणुकीत कराड उत्तर आणि दक्षिणेत दोन्ही ठिकाणी कमळ फुलले.‌ दक्षिणेत स्वतः डॉ. अतुल भोसले हे आमदार झाले. मात्र उत्तर मध्ये बाळासाहेब पाटील यांना पराभवाला सामोरे जावं लागलं. त्यामुळे हे राजकीय समीकरण धोक्यात आल्याची चर्चा तेंव्हापासून सुरू झाली. त्यातच कराड नगरपालिका निवडणुकीपूर्वी काँग्रेस आणि शिंदे गटाबरोबरच जिल्हाध्यक्ष असलेल्या डॉ. अतुल भोसले यांनी "भाजप हाच सर्वात मोठा पक्ष आहे" असे सांगत थेट बाळासाहेब पाटील यांच्या लोकशाही आघाडीतील मोहऱ्यांनाही गळाला लावले. त्यामुळे लोकशाही आघाडीतील कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता आहे.
सध्या दोघांचे राजकीय रस्ते काहीसे विरुद्ध दिशांनी निघाले आहेत. आता नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे दोन्ही नेते पुन्हा एका राजकीय चौकात उभे आहेत. पण ते पुन्हा
एकत्र येतील का? की आपापल्या वाटेने जातील — याचं उत्तरच कराडच्या राजकारणाचा पुढचा अध्याय लिहिणारं ठरणारं आहे.

उमेदवारांच्या मनातील संभ्रम....
या निवडणुकीत नगराध्यक्षपद खुल्या प्रवर्गासाठी राखीव असल्याने सर्वच गटात हालचाल वाढली आहे. अनुभवी नेते आणि नव्या पिढीतील इच्छुक दोघेही ‘योग्य वेळी पत्ता टाकण्याची’ वाट पाहत आहेत.
महायुती आणि महाविकास आघाडी दोन्हींत अंतिम उमेदवार ठरलेले नसल्याने, काही संभाव्य उमेदवारांनी 'युती जाहीर झाल्यावरच उमेदवारी ठरवू' अशी सावध भूमिका घेतली आहे.
दरम्यान, शिंदे गट आणि यशवंत विकास आघाडीने एक पाऊल पुढे टाकत राजेंद्रसिंह यादव यांना नगराध्यक्षपदासाठी उमेदवार म्हणून जाहीर केले आहे. यादव हे पाच टर्मचे अनुभवी नगरसेवक असून, त्यांची ही सहावी टर्म आहे. त्यांच्या नावामुळे महायुतीतील गणित आणखी गुंतागुंतीचं झालं आहे.

आकडेवारीचं गणित आणि राजकीय संतुलन...
या निवडणुकीचा पाया मतदारयादीवरच उभा आहे. ६९८३६ मतदार — त्यात जवळपास समान संख्येने पुरुष आणि महिला मतदार, म्हणजेच प्रत्येक मत निर्णायक. १५ प्रभाग, ३१ जागा, त्यामध्ये १६ महिला प्रतिनिधी अशा रचनेतून सत्ता मिळवायची म्हणजे केवळ पक्षशक्ती पुरेशी नाही — प्रभागनिहाय गणित अचूक बसवावं लागेल. नगराध्यक्ष पद खुल्या प्रवर्गासाठी असल्याने सर्वच प्रमुख नेत्यांची नजर आता योग्य चेहरा शोधण्यावर केंद्रित आहे. प्रत्येक पक्षात अंतर्गत स्पर्धा शिगेला पोहोचली असून, 'युती ठरल्यावर उमेदवारी ठरवू' हीच सध्या बहुतांश इच्छुकांची भूमिका आहे. या अनिश्चिततेमुळेच कराडची राजकीय तापमानरेषा रोज बदलते आहे. प्रभागनिहाय सामाजिक संतुलन, स्थानिक संस्थांशी संबंध आणि घराघरातील संपर्क हे घटक अंतिम फेरीत निर्णायक ठरणार आहेत.

अंतर्गत खदखद आणि बंडखोरीचा सुळसुळाट..
प्रत्येक गटात आता अंतर्गत असंतोष उफाळून येतोय. काही कार्यकर्ते 'आमचं स्थान विसरलं जात आहे' अशा नाराजीने गट बदलण्याच्या तयारीत दिसत आहेत. महायुतीच्या चर्चा सुरू झाल्या तरी शिंदेसेना आणि भाजपमध्ये 'प्रभावकेंद्र कोण' हे ठरवताना मोठी चढाओढ होणार आहे; तर महाविकास आघाडीतही काँग्रेस–उद्धवसेना–शरद पवार गटातील ताळमेळ अजून जुळायचा बाकी आहे.
ही अस्थिरता येत्या काही दिवसांत उमेदवारीत नाट्यमय वळणं आणू शकते.

भाजपमध्ये नगराध्यक्षपदाचा उमेदवार कोण..?
"महायुती झाली तरीही नगराध्यक्ष पदाचा उमेदवार आमचाच राहणार" यावर भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार डॉ. अतुल भोसले हे ठाम असल्याने भाजपमध्ये खुल्या प्रवर्गातील नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांच्या मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू झाली आहे. यामध्ये आता मूळ भाजप आणि नव्याने पक्षात आलेले असे दोन प्रवाह तयार होऊ पाहत आहेत. वर्षानुवर्ष पक्षासोबत एकनिष्ठ असलेल्या निष्ठावंताला ही संधी द्यायची ? का पक्षात नव्याने आलेल्या वजनदार नेत्याला नगराध्यक्ष पदाचा चेहरा म्हणून पुढे आणायचे? याची चर्चा भाजपमध्ये वरिष्ठ पातळीवर सुरू आहे. या संदर्भात कोणते निर्णय घेतले जातात आणि कोणाला संधी दिली जाते ? हे पहायला मिळेल मात्र हा निर्णय घेताना पक्ष एकसंघ ठेवण्याचं आव्हान ही भाजप नेतृत्वासमोर असणार आहे.

सत्ता कोणाच्या दारी आणि पराभव कोणाच्या अंगणी..!

कराड नगरपालिका निवडणूक म्हणजे फक्त स्थानिक सत्तेची लढत नाही — ती दोन पिढ्यांच्या नेतृत्वशैलींची आणि दोन विचारसरणींच्या मध्ये होणारी टक्कर आहे.
एकीकडे अनुभव आणि संघटनशक्तीचा दृढ विश्वास, तर दुसरीकडे नव्या चेहऱ्यांचा उत्साह आणि स्थानिक पातळीवर रूजत असलेली नवी समीकरणं, असा हा संघर्ष आहे. यामध्ये महायुती व महाविकास आघाडी दोन्हींचं ‘घोंगडं’ अजून भिजतंय, त्यावर इच्छुक उमेदवार नजर ठेवून आहेत.
आघाड्या जुळतील की फुटतील, हे अजून ठरलेलं नसलं तरी
लवकरच हे चित्र स्पष्ट होईल. आणि त्यावरच ठरेल की 'कराडमध्ये सत्ता कोणाच्या दारी आणि पराभव कोणाच्या अंगणी!'

Post a Comment

एम.जे.न्युज ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही. किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला official website म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मधे आपला संपर्क क्रमांक अथवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तिक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारींवर लक्ष देवू शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यागतांना संबंधित तक्रारी, योजनेबाबतच्या चौकशी किंवा संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा संबंधित अधिकाऱ्यांना भेट देऊन खात्री करावी अशी विनंती करीत आहोत . धन्यवाद!

Previous Post Next Post